जायकवाडी
पर्यंत पाण्याची वाढती तूट व त्यावरील उपाययोजना.
जायकवाडी
धरणापर्यंत येणारे सर्व पाणी महाराष्ट्रात वापरण्यास लवादाची मुभा आहे.
जायकवाडीच्या वरच्या भागात ३१ प्रकल्प यापूर्वी बांधून पूर्ण झालेले आहेत. आता
पाणी उपलब्धता नसल्याने नवीन धरणे बांधता येणार नाहीत. अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद व
जायकवाडी धरणाखालील बाजूस असलेला जालना, परभणी, माजलगाव, परळी हा सर्व भाग
जायकवाडीवर अवलंबून आहे. पावसाची अनियमितता व अनिश्चितता तसेच वाढते शहरीकरण व
वाढती लोकसंख्या या पार्श्वभूमीवर मर्यादीत पाणी उपलब्धता यामुळे मागणी व पुरवठा
यातील संतुलन बिघडून पाणी हे वादाचे कारण झालेले आहे. नाशिक, औरंगाबाद येथील
उद्योग यापुढे पाणी टंचाई मुळे संकटात येऊ शकतात. बिगर सिंचन मागणी ७.१५ टी एम सी वरून ३४.५ टी एम
सी एवढी झाली आहे . त्यामुळे सिंचनासाठी मिळणारे
पाणी कमी कमी होत आहे . या पाणी
प्रश्नांची सोडवणूक करण्याचा एक मार्ग म्हणजे पाण्याचे व्यवस्थित नियोजन करणे.
त्याचाच एक भाग म्हणजे ऊर्ध्व वैतरणा धरणमार्गे सह्याद्रीच्या समुद्राकडील भागात
पडणारे व पुढे अरबी समुद्रात जाऊन मिळणारे विपुल पाणी गोदावरी नदी खोऱ्यात वळविणे
हा होय.
ऊर्ध्व
वैतरणा धरणाचे पूर्ण पाणी मुंबईसाठी असल्याने या धरणाचा उपयोग केवळ मध्यस्त म्हणून
केल्यास मुंबई पाणी पुरवठ्यावर कांहीही विपरीत परीणाम न करता कमी खर्चातही मोठ्या
प्रमाणात पाणी वळविता येते.
Ø विनाउपसा प्रवाही पध्दतीने
किती पाणी वळविता येते ..
१) ऊर्ध्व वैतरणा धरणाची पूर्ण पाणी
साठवण पातळी समुद्र सपाटी पासून ६०४ मी वर आहे. या धरणाजवळ गोदावरी खोऱ्यातील
मुकणे नावाचे धरण आहे ज्याची पूर्ण पाणी साठवण पातळी ५९५ मी आहे. उंचावरील पाणी
नैसर्गिकरीत्या त्यापेक्षा कमी पातळीवर असलेल्या मुकणे धरणात येऊ शकते. त्यामुळे
ऊर्ध्व वैतरणा धरणाचे पुराचे समुद्रास वाया जाणारे पाणी खाली चित्रात दाखवलेल्या भागात लोखंडी दरवाजे
बसवून मुकणे धरण जलाशयात वळविता येऊ शकते. यासाठी ५ दरवाजे बसवावी लागतील. कोणतेही
भूसंपादन न करता केवळ १० कोटी पेक्षा कमी खर्चात २ अब्ज घनफूट (टी एम सी) पाणी
मिळू शकेल.
२)
ऊर्ध्व वैतरणा धरणात आसपासच्या भागातील पाणी वळवून आणल्यास हे पाणी याच लोखंडी
दरवाज्यांचा उपयोग करून गोदावरी खोऱ्यात आणता येऊ शकते. किती ठिकाणाहून पाणी
ऊर्ध्व वैतरणा धरणात येऊ शकते. ते कसे आणता हे आता पाहू या.
अ)
दमणगंगा
नदीच्या वाघ उपनदीचे २५ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्रावरील उपलब्ध होणारे २ टी एम सी पाणी ऊर्ध्व वैतरणा धरणात ६.५ कि मी
बोगद्याद्वारे खाली चित्रात दाखवलेल्याप्रमाणे वळविता येउ शकते. हे पाणी
महाराष्ट्र राज्याचे असून केवळ वळण बांध व बोगदा करून हे पाणी उतार असल्यामुळे केवळ गुरुत्वाकर्षणाने येऊ
शकते हे विशेष.
ब) वैतरणा
नदीची पिंजाळ ही उपनदी असून या नदीचे १७ चौरस किलोमीटर पाणलोटातील १.२५ टी एम् सी पाणी
खाली चित्रात दाखवलेल्याप्रमाणे उर्ध्व वैतरणा धरणात वळविता येऊ शकते. या साठी समतल कालवा
चित्रात दाखवल्याप्रमाणे करावा लागेल.
Ø कमी उंचीची उपसा करून १.६ टी एम् सी मिळविणे.
क) वैतरणा नदीचे ऊर्ध्व
वैतरणा धरणाखालचे पाणी उपसा करून ऊर्ध्व वैतरणा धरणात येऊ शकते त्यासाठी खाली
चित्रात दाखविल्याप्रमाणे साठवण धरण करून
केवळ १०० मी उपसा करून २३ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणारे
१.६ टी एम् सी पाणी मिळू शकते.
वर दर्शविल्या प्रमाणे योजना
केल्यास २२५ वर्ग किलीमीटर पाणलोट क्षेत्रावरील
एकूण ६.८५ टी एम् सी मिळू शकते .
मुंबईस पाणी पुरविण्याची पर्यायी
व्यवस्था करणे व ऊर्ध्व वैतरणा धरणाचे ११ (अकरा) टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात प्रवाही
पद्धतीने वळविणे.
मुंबई
समुद्रसपाटीस असल्याने कोकणातील बहुतांश नद्यांचे पाणी मुंबईस देता येऊ शकते. उल्हास,
वैतरणा खोऱ्यात ६२२ टी एम सी पाणी उपलब्ध आहे. या पाण्याचे नियोजन केल्यास मुंबईस पुढे
कधीही पाणीटंचाई होऊ शकणार नाही . मुंबईस सध्या २२ लहान मोठ्या धरणातून पाणी
पुरवठा होतो व आणखी १० धरणांची काम प्रगतीपथावर आहेत.
या प्रगतीपथावरील धरणांची कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईस पाण्याचा प्रश्नच
उद्भवणार नाही. तरीही भविष्यात आणखी पाणी लागणार असल्यास मुंबईसाठी वरील
धरणांव्यतिरिक्त खाली दर्शविल्याप्रमाणे प्रकल्प करणे शक्य आहे.
दमणगंगा नदीचे
पाणी सूर्या प्रकल्पामार्गे मुंबईस देता येऊ
शकते. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र महाराष्ट्रातील असल्याने केंद्रीय जल
आयोगाच्या मार्गदर्शक सुत्रानुसार महाराष्ट्रास ते पाणी वापरण्याचा पूर्ण अधिकार
आहे. शिवाय दमणगंगा खो-यातील महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी अद्यापही वापरले गेले नसल्याने या खो-यात वरील नद्यावर धरणे
बांधता येऊ शकतात. दमणगंगा नदीचे पाणी पिंजाळ खोऱ्यातील प्रस्तावित
पिंजाळ धरणात घेण्याएवजी ते पाणी पूर्वीच बांधलेल्या सूर्या धरणात नेणे सहज शक्य
आहे. असे नियोजन केल्यास मुंबईसाठी पिंजाळ धरण (नकाशात लाल रंगाने दर्शविल्या प्रमाणे)
करण्याची गरज देखील नाही. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे सुर्या धरणाचा वापर करण्याचा सोपा व कमी खर्चाचा पर्याय करणे
योग्य होईल.
प्रस्तावीत पिंजाळ धरण
२) पिंजाळ नदीचे पाणी मोडक
सागरात घेणे.
पिंजाळ नदी वैतरणेची उपनदी आहे. या नदीचे पाणी खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे
मोडक सागरात प्रवाही पद्धतीने घेतल्यास मुंबईसाठीस अजून ऐक पाणी व्यवस्था होऊ शकते. पिंजाळ नदीवर अनेक
ठिकाणी साठवण तलाव करून ते गरजेनुसार मोडक सागरात नेता येते.
३) जुन्या धरणाच्यावर साठवण धरणांची निर्मिती करणे.
मुंबईस पाणी पुरवठा करणारी धरणे दरवर्षी भरून वाहतात. हे तानसा, भातसा,
मोडकसागर इत्यादी धरणाच्या आकडेवारीवरून दिसून येईल. या नद्यांवर या धरणाच्यावर
साठवण धरणांची कामे करून अतिरिक्त पाणी साठा करून तो मुंबईस पुरविण्याच्या
पर्यायावर विचार होऊ शकतो.
४) मुंबईत पडणाऱ्या
पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे
महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या शहरात छतावरील पाण्याचे संवर्धन करणेबाबत (Roof Top Harvesting) आग्रह धरला जातो. मालदीव
मध्ये तर छतावरील पाणी साठवून ते वर्षभर वापरतात. असा प्रयोग तामिळनाडू राज्यातील
राजधानीचे शहर असलेल्या महानगरी चेन्नईमध्येही करण्यात आला आहे आणि त्याचे
निष्कर्षही उत्तम आले आहेत. मुंबईत तर २२०० मी मी पाऊस पडतो. त्यामुळे काही प्रमाणात
मुंबई महानगरी मध्ये हा प्रयोग राबविणे सहज शक्य आहे. अशा पध्दतीने जल संवर्धन
करून प्रगत जगात प्रती माणसी जेवढे पाणी
वापरतात तेवढेच पाणी मुंबईकरानी वापरल्यास सर्वाना पाणी मिळून पाणी टंचाई
भासणार नाही.
(अरुण घाटे)
उप विभागीय अभियंता


